पिंपरी : पत्नीने अनेकांना बनावट डिग्री मिळवून दिल्याची पतीची पोलिसांकडे तक्रार

पिंपरी : ८ वर्षापूर्वी आपल्या पत्नीने इतरांच्या मदतीने आसाममधील एका विद्यापीठाची एमबीएची बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करुन तिघांना पदवी मिळवून दिल्याची फिर्याद खुद्द पतीने आता पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी पत्नीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी प्रमोद बालाजी जाना (वय ४४, रा. महात्मा फुले पेठ) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी संदिपा प्रमोद जाना (वय ३८, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड), सागर मापारी, देबोराह जोसेफ (रा. विशाखापट्टणम), नंदा देबोराह जोसेफ (रा. विशाखापट्टणम) आणि करमदीप कौर (रा. ईलम सिटी क्लासबर्ग, एमडीयुएएस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रमोद आणि संदिपा हे दोघे पती पत्नी असून ते गुजरात कॉलनी येथे राहत होते. सध्या प्रमोद जाना हे महात्मा फुले पेठ येथे राहतात. त्यांनी हा आपल्या पत्नीने व इतरांनी केलेला प्रकार आपण संदिपा हिला दिलेल्या मोबाईलमधील व्हॉटसअपमध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये पाहिल्याचा दावा केला असून त्यानंतर आता २ वर्षांनी त्यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांची पत्नी संदिपा जाना या २०१३ मध्ये बावधन येथील कंपनीत कामाला होत्या. तेथील सागर मापारी हा संदिपा यांच्या संपर्कात आला. त्या दोघांनी व इतरांनी मिळून आसाम डाऊन टाऊन युनिव्हरसिटी ची एमबीए पदवीची खोटी व बनावट कागदपत्रे व प्रमाणपत्रे तयार करुन त्यावर बनावट सहीचा व बनावट शिक्यांच्या वापर केला. ती कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देबोराह जोसेफ, नंदा जोसेफ आणि करमदीप कौर यांच्या नावे व इतरांच्या नावे तयार करुन दिली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.