Pimpri : बिर्ला, सिटी केअर, स्टार मल्टीस्पेशालिटी आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाला नोटीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाची सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना नाहक रुग्णालयात दाखल करून घेऊन, कोरोनाच्या रुग्णांकडून जादा बील आकारणी केल्या प्रकरणी चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच या रुग्णालयांना आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा बिलांची तपासणी करणाऱ्या समितीचे प्रमुख तथा आयकर विभागाचे सह आयुक्त एन. अशोक बाबू यांनी केली आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. शहरातील 25 ते 30 खासगी रुग्णालयाने कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या आदेशानुसार कोविड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा तक्रारी लोकप्रतिनिधी, नगरसेवक, रुग्णांचे नातेवाईक, सर्वसामान्य नागरिकांडून आल्या होत्या. त्याची तपासून करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी समितीची स्थापना केली आहे. आयकर विभागाचे एन.अशोक बाबू समितीचे नेतृत्व करत आहेत.

या समितीने शहरातील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देत पाहणी केली. या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठीचे शुल्क, एक्सरे शुल्क, औषध खर्च करण्यासाठीची आकारणी केली जाते. ही आकारणी राज्य सरकारच्या निर्णयानुसार पीपीई किट वगळता 4 हजार, 7500 आणि 9 हजार रुपये अशा तीन दराप्रमाणे कोणत्या प्रकारचा उपचार दिला जातो. त्यानुसार बिल आकारणी करणे अपेक्षित आहे.
पण, या विहित दराव्यतिरिक्त अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याचे समोर आले. ही बिल आकारणी योग्य नाही. त्यामुळे रुग्णालय प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.

केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सौम्य लक्षणे, गंभीर लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल न करून घेण्याचे निर्देश आहेत. त्याचे उल्लंघन करून असे रुग्ण दाखल करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे देखील या चार रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे.