पिंपरी-चिंचवडमध्ये 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंता तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसून कुमार झा याने राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं.

पुणे जिल्ह्यातील वाकड भागात असलेल्या लॉरेल सोसायटीत प्रसून कुमार झा सहाव्या मजल्यावर राहत होता. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक जण घरुन काम करत आहेत. प्रसून आपल्या दोन मित्रांसह आज सकाळी घरी होता.

सकाळच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी घेऊन प्रसूनने आत्महत्या केली. 28 वर्षीय प्रसून झा याचं नुकतंच लग्नही ठरलं असल्याची माहिती आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रसून कुमार झा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करत होता. अचानक त्याने राहत्या इमारतीतून खाली उडी मारुन जीवन संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.