पिंपरीत महिला पत्रकाराच्या आत्महत्येनं प्रचंड ‘खळबळ’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि एका दैनिकात जेष्ठ पत्रकार असलेल्या निशा पाटील-पिसे यांनी काल (गुरूवारी) रात्री राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी निशा पाटील-पिसे यांचे बंधू महेश शिंगोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून निशा यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी निशा यांचे पती प्रशांत पांडुरंग पिसे याला ताब्यात घेतले आहे. आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू पत्रकार म्हणून त्या ओळखल्या जात. वेगवेगळ्या वृत्तपत्रात महत्वाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. एका दैनिकामध्ये उपसंपादक म्हणून त्या कार्यरत होत्या.
काल रात्री पावणेनऊ वाजता त्या कार्यालयातून घरी गेल्या. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी खोलीचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Visit : Policenama.com