पिंपरी : कोयत्याने हल्ला करुन बँकेच्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन  – एचडीएफसी बँकेच्या ‘एटीएम’ सेंटर मध्ये पैसे भरून बाहेर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दोघांनी हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न केला. हि घटना पिंपरी कामगारनगरमध्ये सोमवारी (२३ डिसेंबर) भरदिवसा घडला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.

एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करणारे श्रीधर समाधान वाघमारे (२४, रा. फुरसुंगी) व सुरक्षारक्षक संतोष बीजबिहारी पांडे हे दोघे या घटनेत जखमी झाले आहेत. याप्रकरणी दुचाकीवरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे त्यांचा सहकारी धीरज जाधव व गनमॅन म्हणून नियुक्तीस असणारे पांडे या तिघांनी सोमवारी सकाळी संततुकारामनगर पिंपरी मधील दोन एटीएममध्ये काही लाख रुपयांची रोकड भरली. त्यानंतर ते दुपारी दीडच्या सुमारास कामगारनगर येथील एचडीएफसीच्या बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी आले.

एटीएम सेंटरच्या समोरील बाजूला रस्त्यावर कॅशव्हॅन लावून तिघेही सहा लाख रुपये मशिनमध्ये भरल्यानंतर तिघेही एटीएम सेंटरमधून बाहेर आले. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वाघमारे व पांडे यांच्यावर कोयत्याने वार केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. नागरिकांची गर्दी झाली. परंतु, आरोपींच्या हातात कोयता असल्याने नागरिकांमधून कोणीही वाघमारे यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही. यात वाघमारे यांच्या खांद्यावर तर पांडे यांच्या कानावर वार झाला. त्यानंतर आरोपींनी वाघमारे यांच्या हातातील ब्रिफकेस (बॅग) हिसकावून तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांची दुचाकी काही अंतरावर जाऊन एका गाडीला धडकली. त्यामुळे दोघे खाली पडले. पडल्यामुळे बॅग उघडली. तेव्हा बॅगेत पैसे नसल्याचे समजल्याने आरोपी बॅग रस्त्यावर टाकून पसार झाले. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिस नियंत्रणकक्षाला कळविली. पिंपरी व गुन्हेशाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींकडून आरोपींबाबत माहिती घेतली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/