पिंपरी : कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि चुकीच्या कामाला थारा नाही’ अशी ओळख असणारे कृष्ण प्रकाश यांनी आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारला आहे.

मावळते पोलीस आयुक्त संदीप संदीप बिष्णोई यांनी कृष्ण प्रकाश यांना पदभार दिला. पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ओळख आयर्नमॅन म्हणून असून ते झारखंड मधील हजारीबाग येथील आहेत. 1998 च्या आयपीएस बॅचचे असणारे कृष्ण प्रकाश यांच्या नावावर सायकलिंग, स्विमिंग, रनिंग यासारखी अनेक रेकॉर्ड आहेत.

‘रेस्ट ॲक्रॉस वेस्ट अमेरिका’ या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. 1 हजार 500 किलोमीटर अंतर सायकलिंगची स्पर्धा असून हिचा मार्ग पश्चिम अमेरिकेच्या चार राज्यातून जाणारा असतो. या मार्गावर काही ठिकाणी अति उष्ण तर काही ठिकाणी अतिशय थंड प्रदेश लागतो. या स्पर्धेसाठी 92 तासांचा वेळ असतो. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा 88 तासात पूर्ण करून स्पर्धेत यश मिळवले. तसेच सायकलिंगमध्येही नवीन रेकॉर्ड बनवला.

ऑगस्ट 2017 मध्ये फ्रांस मध्ये ‘आयर्नमॅन ट्रायलथॉन’ ही स्पर्धा झाली. 3.86 किलोमीटर पोहणे, 42 किलोमीटर धावणे आणि 180 किलोमीटर सायकल चालवणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. कृष्ण प्रकाश यांनी ही स्पर्धा देखील 14 तास 8 मिनिटात पूर्ण करून वयाच्या 42 व्या वर्षी आयर्नमॅनचा किताब मिळवला आहे.

नेहमी हसतमुख असणारे कृष्ण प्रकाश हे कामातही खिळाडू वृत्तीचे असल्याचे बोलले जाते. गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडणारे अशी त्यांची ओळख आहे. नावा प्रमाणेच काम करणारे म्हणजेच चुकीच्या कामांना थारा दिला जात नाही असे त्यांच्याबाबत बोलले जाते. त्यांनी राज्यात यापूर्वी ज्या ठिकाणी काम केले आहे तिथे त्यांचे चांगले नाव आहे. पोलीसी खाक्या दाखवून गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी त्यांची ओळख आहे.