पिंपरी : चिखलीचे स्थानिक पोलीस सुस्त, ‘ATM’ फोडण्याचे सत्र सुरूच

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरातील एटीएम सेंटर फोडण्याचे प्रकार काही केल्या थांबताना दिसत नाहीत. शहरात गुन्हे शाखेची एवढी पथके असताना, स्थानिक पोलिसांचे ‘डिबी’ पथक असताना देखील गुन्हेगार मिळू शकत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. गुरुवारी (दि.१२) पहाटे म्हेत्रे वस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याच चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडली होती. मात्र स्थानिक पोलीस सुस्त झाले असून गुन्हेगार सुसाट सुटले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हेत्रे वस्ती चिखली येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. पहाटे दोन वाजताच सुमारास एक चोरटा पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएम सेंटरमध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील रोडच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील दर्शनी भागाची तोडफोड केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हे चोरटे स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन आठवड्यांपूर्वी चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे पोलिसांच्या गस्तीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
एटीएम फोडण्याचे प्रकार रोखण्यासाठी खुद्द पोलीस आयुक्त वेगवेगळ्या स्वरूपाच्या उपाय योजना करत आहेत. मात्र स्थानिक पोलीस सुस्त झाले की काय असा प्रश्न पडत आहेत. याच परिसरात अनेक घटना घडून देखील चोरटे मोकाट फिरत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/