पिंपरी : मुल होण्यासाठी भयंकर प्रकार, विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहितेला मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासरच्या मंडळीने तिच्या डोक्यावर लिंबू कापणे, महारांजांनी दिलेला अंगारा चहा- नाष्टातून खाऊ घालणे असे अघोरी प्रकार केले. तसेच लग्नातील मानपानासाठी माहेरहून 25 लाख घेऊन ये म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पैसे न आणल्यास तिला व तिच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी दिली. 5 डिसेंबर 2019 ते ऑक्टोंबर 2020 या कालावधीत रहाटणीत ही घटना घडली.

या प्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रशांत रमेश लोहार (वय 32), सासू मीना रमेश लोहार (वय 50), नणंद हर्षदा भूषण मेहता (वय 28 सर्व रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याबाबत विवाहितेने पतीला सांगितले असता, त्यानेही तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तू मला घटस्फोट दे, नाहीतर तुला व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन, अशी विवाहितेला धमकीही दिली. विवाहितेला मुलगा व्हावा यासाठी महाराजांच्या सांगण्यावरून सासूने विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापणे, महाराजांनी दिलेला अंगारा चहा, नाष्ट्यातून खाऊ घालणे, विवाहितेला रात्र-रात्र एकाच कुशीवर झोपण्यास भाग पाडणे असे अघोरी प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.