पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे रिपोर्ट आज (दि.29) पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भोसरीचे आमदार लांडगे यांचा वावर बाहेर मोठ्याप्रमाणात होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शहर दौ-यावर आले असताना लांडगे त्यांच्यासोबत होते. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला त्यांनी भेट दिली होती. आमदार लांडगे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्या घशातील द्रवाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी यांचीही टेस्ट करण्यात आली असून त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या हायरिस्क कॉन्टक्टमधील नागरिकांची आता तपासणी केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुणे विधान भवनात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी ही आमदार लांडगे बैठकीला उपस्थित होते.

त्याचबरोबर आमदार लांडगे यांनी पिंपरी पालिकेतील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. आयुक्तांच्या अॅन्टी चेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये किती जणांची तपासणी करावी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.