Pimpri News : गुन्हे शाखेच्या 3 मोठ्या कारवाईत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांना अटक

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध धंदे चालवणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने मागील चार दिवसात केलेल्या कारवाईत 9 लाख 6 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सहा आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मयुर वाडकर व गणेश मालुसरे यांना चिंचवड आकुर्डी लिंक रोडवरील तळवडे चौकात एका पान टपरीच्या मागे ऑनलाईन लॉटरी जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 84 हजार 130 रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले. या कारवाईत शशांक अनिल कसेरवाणी (वय-29 रा. विधाता सोसायटी, यमुनानगर, मुळ रा. जि. रिवा, मध्यप्रदेश), अनिल मधुकर शिरसाट (वय-25 रा. चिखली, मुळ रा. लातुर), चंद्रकांत हरीदास सक्षम (वय-22 रा. चिखली, मुळ रा. ममतापुर, लातुर) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 22 डिसेंबर रोजी करण्यात आली.

दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना देहु आळंदी रोडवर तळवडे चौकामध्ये असलेल्या कृष्णा सुपर मार्केट या दुकानात अवैध रित्या तंबाखूजन्य पदार्थाची साठवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कृष्णा सुपर मार्केट दुकानावर छापा टाकून 6 लाख 29 हजार 571 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत बिंदु चंदी यादव (वय-33), दिपक चंदी यादव (वय-22 दोघे रा. माउली हौ.सोसायटी, तळवडे) यांना अटक केली. त्यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचने केलेल्या तिसऱ्या कारवाईत 1 लाख 92 हजार 602 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई 26 डिसेंबर रोजी देहुरोड मेन बाजार येथील क्रिस्टल ब्युटी सलुन अँन्ड स्पा या ठिकाणी करण्यात आली. देहुरोड बाजारात अवैध रित्या तंबाखूजन्य पदार्थाची साठवणूक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत रियाज अजिज शेख (वय-42 रा. देहुरोड) याला अटक केली असून त्याच्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, राजेंद्र साळुंके, गणेश मालुसरे, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, भरत माने, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, फारुख मुल्ला, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व राजेंद्र कदम यांनी केली.