Pimpri News : विनामास्क पकडलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  –  दुचाकीवरुन जाताना विना मास्क असल्याने पकडलेल्या तरुणाने पोलीस अधिकार्‍याची उद्धट वर्तन केले. नाशिक पुणे महामार्गावर येणार्‍या वाहनांसमोर आडवे पडून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला भोसरी पोलीस ठाण्यात नेल्यावर तेथे त्याने खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारुन स्वत:ला जखमी केले व तुटलेल्या काचेचा तुकडा पोलिसांना मारुन त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला.

विकी अरविंद बागुल (वय २५, रा. सँडवीक कॉलनी, दिघी रोड, भोसरी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या या गोंधळामुळे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला. तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार नाशिक पुणे रोडवरील गुडविल चौकाच्या पाठीमागे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार राजीव रणदिवे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. रणदिवे हे वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. विकी बागुल हा विनामास्क जात असताना त्यांनी त्याला अडविले. तेव्हा विकी त्यांच्या उद्धट बोलून तू ट्राफिकवाला आहेस, तुला काय अधिकार आहे पावती करायचा असे म्हणून आरडाओरडा करुन अंगावर धावून गेला. वयाने ज्येष्ठ असलेल्या रणदिवे यांची गचांडी पकडून त्यांची झटापट केली. त्यात त्यांचा चष्मा फुटला. त्यानंतर त्याने नाशिक पुणे महामार्गावर गोंधळ घातला. येणार्‍या वाहनांच्या पुढे तो आडवा पडला. पोलिसांनी त्याला पकडून भोसरी पोलीस ठाण्यात आणले. तेथेही तो शांत बसला नाही. त्याने रुमच्या खिडकीचे काचेवर डोक्याने धडक दिली. त्यात तो जखमी होऊन काच फुटली. या काचेचा तुकडा उचलून त्याने तो रणदिवे यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. ते बाजूला झाल्याने त्याच्या हल्ल्यापासून वाचले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.