Pimpri News : तरुणीनेच गुंगीचे औषध देऊन तरुणाला लुबाडले, Bumble डेटींग अ‍ॅपवरुन झाली होती ओळख, वाकडमधील सायजी हॉटेलमधील घटना

पिंपरी (Pimpri ) : शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करणे, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन त्यांना धमकावून त्यांच्यावर वारंवार शरीरसंबंध करणे अशा तक्रारी आपण आपल्याकडे नेहमीच दाखल झाल्याचे दिसून येते. पण, एका तरुणीने तरुणाला कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन लुबाडल्याची घटना वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये घडली आहे.

याप्रकरणी चेन्नई येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी व यातील आरोपी तरुणी यांची बंबल डेटींग अ‍ॅपवरुन ओळख झाली होती. फिर्यादी व आरोपी हे चॅटींग करत असताना या तरुणीने मला कामाची गरज आहे, असे सांगून या तरुणाला हॉटेल सयाजी येथे भेटायला बोलावले होते. तरुणीने बोलावले म्हटल्यावर हा तरुण अंगावर दागिने घालून १७ जानेवारी रोजी तिच्या रुममध्ये गेला. रात्री तिने त्याला कोल्ड्रिंक पिण्यासाठी दिले. त्यानंतर त्याला गुंगी आली. त्यानंतर या तरुणीने त्याच्या अंगावरील ९० हजार रुपयांची सोन्याची चैन, २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख १५ हजार रुपये असा १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घेऊन ती तरुणी पळून गेली. पहाटे ५ वाजता त्यांना जाग आल्यावर त्याचा हा सर्व प्रकार लक्षात आला.

या तरुणाचा चेन्नईमध्ये व्यवसाय आहे. त्यानिमित्ताने तो पुण्यात आला होता. मित्रांशी चर्चा केल्यावर त्याने शनिवारी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.