रामदास पाध्येंनी उलगडला बोलक्या बाहुल्यांचा प्रवास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ़ चिंचवडच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या शिशिर व्याख्यानमालेत जगप्रसिद्ध बाहुलीकार रामदास पाध्ये आणि अपर्णा पाध्ये या दांपत्यानी बोलक्या बाहुल्यांच्या शंभर वर्षाचा प्रवास उलगडला. यावेळी या दाम्पत्यास ते रंगवत असलेल्या “अर्धवटराव व आवडी” बोलक्या बाहुल्यांच्या पात्रांसाठी त्यांना कलागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे,सचिव प्रवीण गुणवरे,राजन लाखे, प्रकल्प प्रमुख संजय खानोलकर आदी उपस्थित होते.

सौरभ सोहनी यांनी रामदास पाध्ये यांची मुलाखत घेतली. पाध्ये म्हणाले कि, ‘१९१६च्या दरम्यान माझे वडील प्रा. वाय के पाध्ये जादूचे प्रयोग करायचे. नंतर त्यांना बोलक्या बाहुल्यांची कल्पना सुचली. परदेशातून मागवलेल्या बाहुल्यांचे त्यांनी “अर्धवटराव” व “आवडी” आणि त्यांची मुले “गंपु-चंपु” असे नामकरण केले. मी शब्दभ्रमनाचे ११ वर्षे धडे घेतल्यानंतर वडिलांच्या कार्यक्रमात केवळ ५ मिनिटे प्रयोग करण्याची मला संधी मिळाली.

दुर्दैवाने ८ दिवसांत वडीलांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मग बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग करत वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे शिवधनुष्य उचलले. सुरुवातीला हॉटेलमध्ये कॅब्रा डांसच्या मधल्या वेळेत शो करीत असे. एक अमेरिकन व्यक्तीने हे पाहिल्यावर मला अमेरिकेतील टीव्हीवर शो करण्याची संधी मिळाली. त्यांनतर आजतागायत मागे वळून पाहिले नाही. या बोलक्या बाहुल्यांमुळे परदेशवारी, गाडी, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवून दिली. तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन पासून ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सिनेमात कामे केली.

आता हि परंपरा माझा मुलगा सत्यजित हा स्वतः सीए असून देखील या बाहुल्यांचे प्रयोग करीत आहे. बाहुल्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सुंदर प्रयोग करीत असल्याचे सांगितले. या कार्यात माझ्या कुटूंबातील सर्व सदस्यांची मोलाची साथ लाभली आहे. प्रयोगातून आम्हाला किती पैसे मिळतील यापेक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन आणि मनोरंजन कसे होईल याकडे अधिक लक्ष देतो.

अपर्णा पाध्ये म्हणाल्या कि,शंभर वर्षांचा प्रवासाचे सेलिब्रेशन हे बाहुल्यांचे शंभर प्रयोग करून साजरे केले जाणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिल्पागौरी गणपुले यांनी तर आभार प्रवीण गुणवरे यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा –