Pimpri News : तरुणीचा विनयभंग करणार्‍याची पोलिसाला मारहाण, रोड रोमिओला आळंदी पोलिसांनी केली अटक

पिंपरी : ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात बसलेल्या तरुणीचा किस घेऊन तिचा विनयभंग करणार्‍याने पोलीस शिपायाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार आळंदीमध्ये घडला. याप्रकरणी ज्ञानेश्वर आश्रुबा देवकाते (रा. इंद्रायणी नगर, ता. हवेली) याला अटक केली आहे. त्याचे मित्र राहुल दौंडकर (रा. शेल पिंपलगाव), विष्णु नरवडे ( रा. मरकळ रोड, आळंदी), संतोष तापकीर (रा. चर्‍होली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी आळंदी येथील तिच्या मैत्रिणीच्या कार्यालयात रविवारी सायंकाळी साडेचार वाजता गेली होती. मैत्रिणीने तिला दुकानात थांबवून ती बाहेर गेली. त्यावेळी एक जण आला व त्याने या तरुणीच्या गालाचा कीस घेऊन निघून गेला. त्यानंतर काही वेळाने तिघे जण आले. त्यांनी तू थोड्या वेळापूर्वी आलेल्या मुलाला कीस दिला आहे. आम्हालाही दे असे म्हणून तिच्या अंगाशी झटापट करु लागले. तेव्हा या तरुणीने आरडाओरडा केल्यावर ते कार्यालयातून पळून गेले. त्यानंतर तिने पोलिसांना कळविले. पोलीस शिपाई अंकुश राठोड व त्याचे सहकारी तेथे आले. त्यांनी या तरुणीला ही मुले कोठे दिसतात का असे विचारले. तेव्हा एका जणाला तिने पाहून पोलिसांना दाखविले. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना देवकाते याने पोलीस शिपाई राठोड यांच्या छातीवर, पाठीवर व हातावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन दमदाटी केली. तुम्ही पोलीस आमचे काही वाकडे करुन शकत नाही, असे म्हणाला. आळंदी पोलिसांनी देवकाते आणि त्याच्या मित्रांवर विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.