Pimpri News : जेवणाच्या वादातून हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  –  आपल्या पंटरांना जेवण का देत नाही, असे धमकावरुन स्वत:ला भाई म्हणणार्‍या अंबादास पासलकर याने एका हॉटेल चालकावर डोक्यात कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

याप्रकारात अक्षय अशोक चव्हाण (वय २५, रा. पाखरे हाईटस, बाणेर) हे जबर जखमी झाले आहेत. ही घटना पिंपळे निलख येथील हॉटेल विसावामध्ये मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजता घडली.

सांगवी पोलिसांनी अमोल धुमाळ, अक्षय राक्षे आणि अभि मोरे यांना अटक केली आहे. अंबादास पासलकरसह इतर ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय चव्हाण यांचे पिंपळे निलखमध्ये हॉटेल विसावा आहे. तेथे आरोपी जेवण करण्यासाठी आले होते. जेवणावरुन त्यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. काही वेळाने अमोल धुमाळ व त्याच्या ओळखीचे राजू फडतरे, अक्षय राक्षे, अभि मोरे, अंबादास पासलकर व इतर सात ते आठ जण हॉटेलमध्ये आले. त्यांनी चव्हाण यांना शिवीगाळ केली. अंबादास पासलकर चव्हाण याला म्हणाला की, ‘‘माझ्या पोरांना जेवण देत नाही का. तुला ऐवढा माज आला आहे का. तुला माहित नाही का मी इथला भाई आहे. तुला आता संपवतोच़ ’’असे म्हणून पासलकर याने कोयत्याने चव्हाण यांच्या डोक्यात दोन ठिकाणी वार करुन गंभीर जखमी केले.