Pimpri News : कबुतरे उडविण्यावरुन सावत्र भावाच्या खुनाचा प्रयत्न

पिंपरी : कबुतरे उडविण्यावरुन झालेल्या वादात सावत्र भावाने आईच्या मदतीने कुर्‍हाडीने आपल्याच भावाच्या डोक्यात, पाठीवर, हातावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले. चिखली पोलिसांनी याप्रकरणी सावत्र आई, भावासह ४ ते ५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Advt.

सिद्धेश्वर कांबळे, आणि माया कांबळे (दोघे रा. बोल्हाईमळा, कॉलनी, जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर दयानंद कांबळे (वय २८, रा. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. सागर कांबळे हे ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता जेवण करुन घरासमोर उभे होते. त्यावेळी त्यांचा सावत्र भाऊ व सावत्र आई व इतर काही जण तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांचा भाऊ श्रीधर याने कबुतरे का उडविली या कारणावरुन श्रीधर बाहेर ये, तुला खूप मस्ती आली आहे असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा सागर याने विचारल्यावर सागर यांना शिवीगाळ केली. त्यांच्या सावत्र आईने सागर यांना पकडले. सिद्धेश्वर कांबळे याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने सागर यांच्या डोक्यात, हातावर, कपाळावर सपासप वार केले. इतरांना त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. चिखली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक एस़ पी़ देशमुख अधिक तपास करीत आहे.