पिंपरी : आता किराणा दुकानातही मिळू लागला ‘गांजा’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गांजा हा अमली पदार्थ पूर्वी कमी दर्जाचा समजला जायचा. पण त्याची कीक ही मोठी असते, त्यामुळे गरीबांपासून बॉलीवूडच्या कलाकारांपर्यंतच्या श्रीमंताचीही ओढ आता गांजाकडे लागली आहे. ग्राहक वाढल्याने गांजाची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक हे अशा पेडलर्स, विक्रेत्यांवर कारवाई करत असते.

मिळालेल्या माहितीवरुन ते बावधनमध्ये कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांना चक्क एका किराणा दुकानात व फ्लॅटमधून गांजा विक्री होत असल्याचे आढळून आले. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा, मोबाईल, वजनकाटा, गांजा भरुन ओढण्याच्या उपयोगाचा गोगो, रोख रक्कम असा ४ लाख ५८ हजार ९१५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (वय ३८, रा़.हिराई निवास, पाटीलनगर, बावधन) याला अटक केली आहे.चंपावत हा मुळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याचे हिराई निवास या बिल्डिंगमध्ये वेलकम सुपर मार्केट असून त्याच ठिकाणी फ्लॅट नं.८४ मध्ये तो राहतो. दुकान व घरातून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. राजस्थानमधून तस्करी करुन तो गांजा आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे.