Pimpri News : सावधान ! हॉटेलचे बील देताना कार्ड वेटरकडे देताय़, वेटरनेच कार्ड क्लोन करुन ग्राहकांना घातला गंडा

पिंपरी : भोसरी येथील एका हॉटेलमध्ये बील भरण्यासाठी दिलेल्या डेबीट कार्ड क्लोन करुन तिघांच्या खात्यातून पाटणा येथून पैसे काढून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लांडेवाडी चौकातील हॉटेल मधुबन बार अँड रेस्टॉरंटमध्ये ४ ते १५ डिसेंबर दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी उमेश देविदास अन्वेकर (वय ३५, रा. श्रीनगर, पिंपळे गुरव) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अन्वेकर हे ओळखीच्या व्यक्तीबरोबर हॉटेल मधुबन बार अँड रेस्टारंटमध्ये जेवणासाठी गेले होते. तेथील अनोळखी वेटरने बील भरण्याचा बहाणा करुन त्यांचेजवळील डेबीट कार्ड घेऊन ते स्वाईप करुन त्यावरील डाटा क्लोन केला. त्यानंतर त्यांचे बील घेतले. तसेच त्यांच्या तोंडओळखीच्या व्यक्तीचे कार्ड क्लोन केले. या डाटाचा उपयोग करुन दुसरे कार्ड बनवून त्याद्वारे अन्वेकर यांच्या खात्यातून ५० हजार रुपये पाटणा येथून काढून फसवणूक केली. तसेच बाळासाहेब गणपतराव नजन यांच्या खात्यातून २५ हजार रुपये व प्रविण बापू सोनार यांच्या खात्यातून १९ हजार ५०० रुपये असे ९४ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली आहे. तेव्हा हॉटेलचे बील देताना काळजी घ्या. कोणाकडेही परस्पर आपले कार्ड देऊ नका.