Pimpri News : इंदिरा गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामामुळे पुलावरील वाहतूक 3 महिने बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार (दि.21) पासून पुढील तीन महिने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिंपरी वाहतुक विभागाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली असल्याची माहिती पिंपरी वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.

पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामामध्ये पहिल्या टप्प्यातील गोकुळ हॉटेल ते पिंपरी पुलापर्यंतचे काम होईपर्यंत पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतुक ही आहिल्यादेवी चौक मार्गे पिंपरी पुलाकडे वळवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील पुलाचे कामाचे दरम्यान अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पुलादरम्यानची वाहतुक दुहेरी मार्गाने सुरु राहणार आहे. तसेच पुलाखाली राहणारे स्थानिक नागरिक, व्यावसायीक क्रोमा शोरुम मार्गे इच्छित स्थळी जातील.

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.