Pimpri News : चित्रपट निर्मात्यालाच घातला मध्यस्थीने गंडा, चित्रपट विकत घेऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक

पिंपरी (Pimpri ) : सिनेमाच्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये घेतो व काही सिनेमे तुमच्या नावावर करतो, असे सांगून चित्रपट विक्री करणार्‍या मध्यस्थाने पुण्यातील एका चित्रपट निर्मात्याला २९ लाख ५५ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी विक्रम धाकतोडे (वय ३८, रा. शिवछाया सोसायटी, विक्रोळी पश्चिम, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चित्रपट निर्माता अमोल लक्ष्मण कागणे (वय २९, रा. मॅपल टॉवर, वानवडी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम धाकतोडे याने सिनेमाच्या अ‍ॅग्रीमेंटमध्ये अमोल कागणे यांना घेतो व काही सिनेमे त्यांच्या नावावर करतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. त्याबाबत कागणे आणि धाकतोडे यांच्या लेखी करार करण्यात आला होता. असे असताना कागणे यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा वापर सिनेमा विकत घेण्यासाठी न वापरता त्याचा दुसरीकडे वापर केला. तसेच जे काही सिनेमे विकत घेतले ते त्यांना न विचारता परस्पर विक्री केली. तसेच त्यांनी सिनेमाच्या गुंतवणकीसाठी दिलेल्या पैशाचा मोबदला कागणे यांना न देता फसवणूक केली. याबाबत कागणे यांनी हिंजवडीतील मॅक्डोनाल्ड येथील रेस्टारंटमध्ये प्राथमिक रक्कम प्रथम दिली होती. त्यानंतर आनलाईन पद्धतीने सर्व व्यवहार झाले आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे अधिक तपास करीत आहेत.