Pimpri News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पोलीस अधिकारी-कर्मचारी गुन्हेगारांचा कर्दनकाळ असले पाहिजे, तर सामान्यांना मायेचा आधार वाटला पाहिजे, अशीच आजवर महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्याच पक्तीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांचे नाव गुंफले आहे. भांगे यांच्या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकतेच 50 हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविले आहे.

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश पोपटराव भांगे यांच्या विशेष कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 50 हजार रुपये रोख आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. भांगे यांनी बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) 21 गुन्हे उघड करून 30 लाखांचा मुद्तमाल हस्तगत करीत उत्तम तपास करून कामगिरी बजावली आहे. या अगोदरही भांगे यांनी पुणे शहर पोलीस दलात हडपसर पोलीस स्टेशन, वानवडी पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे शाखेत काम करीत असताना 250 हून अधिक घरफोड्या व 475 हून जास्त वाहनचोऱीचे गुन्हे उघकीस आले आहेत. शिकलगरी टोळीवर विशेष लक्ष केद्रीत करून गुन्हे उघड करण्यासाठी अभ्यास केला. गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून भागे यांचा अऩेकवेळा सन्मान करण्यात आला आहे. तसेच वाहनचोरी तपासातील विशेष कामगिरीबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्त श्री वेंकेटेशम यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे. भांगे यांनी पोलीस दलात फक्त नोकरी नाही, तर सामान्यांना न्याय देत गुंडांवर पोलिसांचा वचक बसविण्याची मोठी जबाबदारी सांभाळली आहे. भांगे यांनी ज्या ज्या ठिकाणी कार्यभार स्वीकारला, त्या त्या ठिकाणी कामाचा ठसा उमटविला आहे, ही बाब खाकी वर्दीची शान वा़ढविणारीच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये निराधार आणि सामान्यांना आधार देत मायेची उब देण्याचे कामही भांगे यांनी केले आहे. त्यांच्या कार्याची पद्धती सामान्यांना आपलेसे करणारी आहे, अशीच प्रतिक्रिया निराधारांकडून व्यक्त केली जात आहे.