Pimpri News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, मुलीसह तृतीयपंथ्याची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – स्पा सेंटरच्या नावाखाली महिला आणि तृतीयपंथ्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणाऱ्या एकाला अटक करुन एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी (दि.4) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील कोळभोरनगर येथील काव्यांजली स्पा सेंटर येथे केली.

दर्पण दिलीप कुमार (वय-32 रा. पाचपीर चौक, काळेवाडी, मुळ रा. डी.आर. रेल्वे कॉलनी, अनसोन, राज्य बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका 35 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश दत्ता वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर नगर येथील जय टॉवर्स या बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या काव्यांजली स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून एका महिलेला आणि एका तृतीयपंथियाची सुटका केली. आरोपी हे महिला आणि तृतीयपंथियांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी 40 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष असवले, नितीन लोंढे, संदीप गवारी, दिपक शिरसाट, योगेश तिडके, मारोतरा जाधव, संगिता जाधव, सुप्रिया यादव, तेजस्विनी शेलार यांच्या पथकाने केली.