Pimpri News : पिंपळे निलखमध्ये चालतोय गॅस चोरीचा धंदा ! एकाचवेळी 4 ठिकाणी छापे; 23 जणांना पोलिसांनी केली अटक

पिपंरी : सांगवीमधील पिंपळे निलखमध्ये गॅस चोरीचा धंदा राजरोजपणे सुरु असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी चार ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तब्बल २३ जणांना अटक केली आहे. ते घरगुती गॅसच्या सिलेंडरमधील थोडा गॅस काढून तो दुसर्‍या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये भरत असल्याचे या छाप्यांमध्ये उघडकीस आले आहे.

दिलीपकुमार सुकराम विष्णोई (वय २२, रा. पिंपळे गुरव, सांगवी), सुनिलकुमार भगवानराम बिष्णोई (वय ३०, रा. शिवनेरी कॉलनी, पिंपळे गुरव), मनषि भवाल (वय २०, रा. पिंपळे गुरव), दिनेश बिष्णोई (रा. पिंपळे गुरव), रामरतन चौहान (वय ३५), प्रमोद ठाकूर (वय ४०, रा. महाराष्ट्र कॉलनी, पिंपळे गुरव), होतमसिंग ठाकूर (वय २३), गौरीशंकर ठाकूर (वय १९), नेत्रपाल ठाकूर (वय २७), छत्रपालसिंग ठाकूर(वय ३१), धमेंद्रसिंग सिंह (वय २८), सुरेशकुमार राव (वय ३१, सर्व रा. पिंपळे गुरव), शंकरपाल बिष्णोई (वय २८ रा. जुनी सांगवी), रोहित चौधरी (वय २३, रा. पिंपळे गुरव), दिनेश ठाकूर (वय ३२), बनवारी जव्हार (वय २२), योगेशसिंग सिंग (वय ३०), महेश कालिराणा (वय १९), सुरज सिंग (वय २०), अजयसिंग सिंग (वय ३०), पप्पुराम ईश्वरलाल (वय ३८), सईराम खिल्लेरी (वय २५, सर्व रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपी यांनी त्यांच्याकडील घरगुती व कमर्शियल भरलेल्या गॅस सिलेंडरमधून इतर गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेऊन गॅस चोरी करत होते. भारत गॅस एजन्सी मालकाच्या सहमतीने हा सर्व प्रकार सुरु होता. एजन्सी मालकांनी त्यांना रिकामे गॅस सिलेंडरपैकी काही रिकामे सिलेंडर जमा न करता व भरलेले गॅस सिलेंडर वितरण करण्यासाठी न जाता एका शेडमध्ये आणून त्यातून काही प्रमाणात गॅस काढून रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये भरतात, याची संपूर्ण कल्पना गॅस एजन्सी मालकांना होती. पिंपळे गुरवमधील कृष्णराज कॉलनीतील एका शेडमध्ये हा सर्व कारभार सुरु होता. तेथून तब्बल ६३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कॉलनी, जांभुळकरपार्क, मोरया पार्क या ठिकाणीही अशाच प्रकारे गॅसमधून थोडा गॅस काढून तो रिकाम्या टाक्यांमध्ये भरला जात होता. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत असल्याचे आढळून आले आहे.