Pimpri News : अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षाला अटक, 2 पिस्टल जप्त

पिंपरी (पुणे): पोलीसनामा ऑनलाइन – अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या खेड तालुका अध्यक्षासह एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई चिखली प्राधिकरणातील जगदंब कार वॉशिंग सेंटर येथे शुक्रवारी (दि.8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास केली.

रणजित बापु चव्हाण (वय-26 रा. वेताळनगर, चाफेकर चौक, चिंचवड), दत्तात्रय किसन गाडे (वय-35 रा. मु.पो. येलवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दत्तात्रय किसन गाडे हा अखिल भारतीय सेना या पक्षाचा खेड तालुका अध्यक्ष आहे. तर रणजीत चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात 12, निगडी 2, वाकड 2, वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 1 असे खुन, खनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा तयारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार रणजीत चव्हाण हा त्याच्या मित्रासह चिखली प्राधिकरण येथील जगदंब कार वॉशिंग सेंटर येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडीत घेतली असता आरोपी रणजित याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच दत्तात्रय गाडे याच्याकडून ही गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, पोलीस अंमलदार अशोध दुधवणे, गणेश हजारे, सुनिल कानगुडे, संदीप पाटील, शकुर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस, अशोक गारगोटे यांच्या पथकाने केली.