Pimpri News : मायलेकरांचा सपासप वार करून निर्घृण खून, पिंपरीत खळबळ

चिंचवड/पुणे :पोलिसनाम ऑनलाइन – आई आणि मुलाचा अज्ञात व्यक्तीने चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.9) रात्री वाल्हेकरवाडी येथे रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.सुमय्या नासीर शेख (वय -40) आणि आयान नसिर शेख (वय- 3,) असे खुन झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहिले असता खोलीमध्ये दोन मृतदेह आढळून आले.दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

घटनास्थळी बिअरच्या बाटल्या, बिस्कीटचे पुडे आणि रक्ताने माखलेला चाकू पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी घर मालकाकडे चौकाशी केली असता त्यांनी सांगितले की 15 डिसेंबर 2020 रोजी खोली दोन तरुणांना भाड्याने दिली होती. बुधवार (दि.6) पासून ते तरुण फरार झाले. यामुळे संशय बळावला आहे. मृत आई आणि मुलगा कोठून आले हे समजू शकले नाही.तसेच ते कधीपासून या खोलीत राहत होते याची माहिती समजू शकले नाही.

दरम्यान , घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठून दिले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.