Pimpri News : …अन् शो-रूमच्या मॅनेजरनेच घातला 12 लाखांना गंडा, पिंपरीमधील घटना

पिपंरी : तीन दशकापूर्वी देशात दुचाकी, कार घ्यायची असेल तर वाट पहावी लागत असे़ त्यासाठी अनेकांनी ‘ऑनमनी’ देऊन गाड्या विकत घेतल्या होत्या. पण मधल्या काळात ही परिस्थिती नेमकी उलटी झाली होती. मात्र, आता मारुती सुझुकीच्या काही चार चाकी गाड्या मिळविण्यासाठी वेंटीग आहे. याचा गैरफायदा नेक्सा शोरुममधील रिलेशनशिप मॅनेजरने घेतला असून ग्राहकांना लवकर कार मिळवून देतो, असे सांगून ऑनमनी घेऊन तसेच वेगवेगळी प्रकारे तब्बल १२ लाख ४६ हजार ३६३ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

अविनाश हनुमंत देसाई (वय २७, रा. आसंडोली, ता़ गगनबावडा, जि़ कोल्हापूर) याच्याविरुद्ध हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बाणेर येथील नेक्सा शोरुमचे एच आर मॅनेजर सागर कृष्णा बाठे यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश देसाई हा नेक्सा शोरुममध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून नोकरीला असताना ऑगस्ट २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान त्याने हा प्रकार केला आहे. शोरुममध्ये येणार्‍या ग्राहकांना मारुती सुझुकी कंपनीच्या विविध चार चाकी गाड्या या वेंटीग असल्याने त्या गाड्या लवकर मिळवून देतो, तसेच या गाड्यावर जास्त रक्कमेची सुट देतो, असे प्रलोभने दाखवून ग्राहकांकडून बुकिंग घेऊन बुकिंगच्या व इतर रक्कमा स्वत:चे गुगल पे खात्यावर व रोख स्वरुपात पैसे घेतले़ ग्राहकांना त्यांच्या मुळ पावत्यांमध्ये एडिट करुन बनावट पावत्या तयार करुन त्यावर शोरुमचे शिक्के मारुन त्या खर्‍या असल्याचे ग्राहकांना भासवून त्यांना दिल्या. ग्राहकांकडून त्यांनी १२ लाख ४६ हजार ३६३ रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली तसेच शोरुमच्या लौकिकास बाधा पोहचवली़, असे फिर्यादीत म्हटले आहे.