Pimpri News : पिस्तुलाच्या धाकाने भरदिवसा तरुणीचे अपहरण, परिसरात खळबळ

चिंचवड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कामावर निघालेल्या तरुणीचे पिस्तूलाचा धाक दाखवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना चिंचवड येथे आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हा प्रकार चिंचवड लोकमान्य हॉस्पिटलसमोर असलेल्या वस्तीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल समोर असलेल्या वस्तीमध्ये राहणारी एक मुलगी सकाळी अकराच्या सुमारास कामावर जात होती. त्यावेळी पाठिमागून आलेल्या तरुणाने मुलीला पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीवरुन पळवून नेले. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

नागरिकांनी तुरुणीचे अपहरण झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील आरोपी परिसरातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून चौकशी सुरु असून पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.