Pimpri News : बुलेट चोरी करणारे दोनजण गजाआड, 13 बुलेटसह 15 दुचाकी जप्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुलेट चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 13 बुलेटसह दोन महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.24) मोशी टोलनाका परिसरात करण्यात आली. आरोपींनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे ग्रामीण आणि मुंबई आयुक्तालयाच्या हद्दीतून बुलेट गाड्यांची चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

विशाल बाळासाहेब मगर (वय-20 रा. लेहणेवाडी, ता. जामखेड, जि. नगर), विशाल बंकट खैरे (वय-21 रा. भुतडाता. जामखेड, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा मुख्य साथिदार अमोल शिवाजी ढोबळे (रा. पतंगनगर, घाटकोपर, इस्ट मुंबई) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विशाल मगर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात फायरिंग करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये बुलेट चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वाहन चोरांची माहिती काढण्यात आली. वाहन चोरी झालेल्या घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषण करुन रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल ढोबळे हा बुलेट मोटार सायकलची चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. अमोल याने चोरलेली एक बुलेट विक्रीसाठी त्याचे दोन साथिदारांना दिली होती. अमोल याचे साथिदार बुलेट विक्रीसाठी मोशी टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मोशी टोलनाक्याजवळ सापळा रचून मगर आणि खैरे याला बुलेटसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी त्यांचा मित्र अमोल ढोबळे याने बुलेटची चोरी करुन ती विक्रीसाठी दिली असल्याची कबुली दिली. तसेच अमोल याने 12 बुलेट विक्रीसाठी जामखेड येथे ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांच्या दोन पथकांनी जामखेड येथून 12 बुलेट आणि इतर दोन महागड्या दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नवी मुंबई, ठाणे परिसरातून 13 बुलेट चोरी करुन त्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. पोलिसांनी 13 बुलेट, एक अपाची आणि एक ॲक्टीवा मोपेड अशा एकूण 20 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाणे 2, भोसरी पोलीस ठाणे 1, भोसरी एमआयडीसी 2, पिंपरी पोलीस ठाणे 1, हिंजवडी पोलीस ठाणे 1, राजगड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) 2, नवी मुंबई आयुक्तालयातील नेरळ पोलीस ठाणे 1, रबाळे पोलीस ठाणे 1, एपीएमसी पोलीस ठाणे 1, ठाणे शहर हद्दीतील कापुरबावडी पोलीस ठाणे 1 असे गुन्हे दाखल आहेत. या कामगिरी बद्दल गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकातील तीन अधिकाऱ्यांना प्रशंसा पत्र देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे आर.आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, गिरीश चामले, हजरत पठाण, यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, नाथा केकान, राजकुमार हनमंते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, प्रमोद ढाकणे, जगदीश बुधवंत, गजानन आगलावे यांच्या पथकाने केली.