Pimpri News : बेकायदा गॅस विक्री करणारा तरुण गजाआड

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन –  बेकायदेशीरपमे मोठ्या सिलेंडरमधील गॅस लहान सिलेंडरमध्ये भरून देऊन चढ्या दराने विक्री करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 81 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे मंगळवारी (दि.5) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली. संताजी तानाजी माने (वय-23 रा. भोईरवाडी, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संताजी माने याने भोईरवाडी येथे आनंदा भोईर यांच्या गाळ्यात आई गॅस एंटरप्रायजेस नावाचे दुकान सुरु केले. यामध्ये विनापरवाना 19.3 किलोच्या कर्मशियल मोठ्या टाक्यांमधून गॅस काढून 4 किलो आणि 8.5 किलो वजनाच्या लहान टाक्यात पाईपच्या सहाय्याने भरुन त्याची चढ्या दराने विक्री करत होता. तसेच त्याने गॅसची साठवणूक केली होती. पोलिसांनी छापा टाकून 145 गॅस टाक्या व इतर साहित्य असा एकूण 81 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील, वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, पोलीस अंमलादर बाळकृष्ण शिंदे, मच्छिंद्र काळे, महेश शिंदे, इसाक शेख, रवी पवार, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.