पिंपरीमध्ये आणखी एका पोलिसाला ‘कोरोना’ची लागण, 5 कर्मचारी ‘क्वारंटाईन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता प्रयत्न दोन पोलीस अधिकाऱ्यांसह सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका पोलीस ठाण्याच्या चौकीत संशयित आरोपीच करोना पॉझिटिव्ह निघाल्याने पाच पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असणाऱ्या एका अधिकाऱ्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एका पोलीस अधिकाऱ्यांमुळे चार जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, दोन भावंडाचा घरगुती वाद पोलीस चौकीपर्यंत पोहचला. तेव्हा एकाची अदखलपात्र तक्रार घेण्यात आली तर दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले. यापैकी, एकाला सर्दी आणि खोकला झाल्याने, तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला असता त्याला करोनाचीबाधा झाल्याचं समोर आलं. ही माहिती समजताच या संबंधित पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.