पिंपरी : हॉटेल निसर्गच्या टेरेसवर खुलेआम ‘हुक्का’ पार्लर; 6 जणांवर FIR दाखल़

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये जेथे बार, रेस्टॉरंट बंद असताना भोसरीतील हाटेल निसर्गच्या टेरेसवर खुलेआम हुक्का पार्लर सुरु असल्याचे आढळून आले आहे. भोसरी पोलिसांनी हॉटेलचालक, जागामालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हॉटेलचालक गणेश नामदेव गोडसे (वय ३१, रा. भोसरी गावढाण), जागामालक नितीन हिरामण गोडसे (वय ४५, रा. लांडेवाडी, भोसरी) आणि ग्राहक केतन सुखदेव वाघचौरे (वय २९, रा. चंद्ररंग पॅराडाईज, पिंपळे गुरव), शिवम शांताराम खोसे (वय २२, रा. आरंभ सोसायटी, मोशी), राहुल भिमराव लोखंडे (वय २८, रा. थेरगाव), महेश राजेश निकम (वय २३, रा. सुखवाणी कॉम्प्लेक्स, वल्लभनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस अंमलदार अनिल महाजन यांनी फिर्याद दिली आहे.
शहरात लॉकडाऊन असताना कासारवाडी नाशिक फाटा येथील हॉटेल निसर्गच्या इमारतीच्या टेरेसवर हुक्का पॉर्लर सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळी या ठिकाणी छापा घातला. यावेळी हॉटेलचालक गणेश गोडसे याने ग्राहकांना एकत्र जमवून त्यांना हुक्का पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. तसेच हुक्का पिण्याचे फ्लेवर, हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य पुरवले. या ठिकाणी चौघे जण हुक्का पिताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून हुक्का फ्लेवर, हुक्का पिण्याचे साहित्य असा २१ हजार ३९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.