पिंपरी : स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे चित्र आज स्पष्ट होणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज सोमवार (दि.२) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज दाखल केला जाणार आहेत. त्यामुळे अर्ज दाखल झाल्यानंतर अध्यक्ष कोण होणार? हे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असून जुने निष्ठावंत असलेले शितल शिंदे हे अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अभिषेक बारणे यांचे नाव देखील ऐंनवेळी पुढे आले आहे. दरम्यान, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक संतोष लोंढे, भीमाबाई फुगे, सुवर्णा बुर्डे यांच्यापैकी एकाच्या नावावर शेवटच्या क्षणी शिक्कामोर्तब होऊ शकते.

स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे जुने, निष्ठावंत असलेले शितल शिंदे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. गेल्या वेळेस शिंदे हे अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक होते. मात्र ऐंनवेळी त्यांचा ‘पत्ता’ कट करण्यात आला होता. मात्र यावेळेस त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. भाजपातील सर्वच बड्या नेते मंडळींकडून शिंदे यांनी ‘हिरवा कंदील’ मिळवला आहे.

महापालिका निवडणुक अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपल्यामुळे स्थायीच्या अध्यक्षपदी स्थानिकाची वर्णी लागावी असा ‘सूर’ धरला जात आहे. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे कट्टर समर्थक असलेले अभिषेक बारणे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला असल्याची माहिती भाजपातील विश्वसनीय सुत्रांनी दिली. त्यामुळे आमदार जगताप सलग चौथ्या वर्षी स्थायीचे अध्यक्षपद स्वत:च्या समर्थकाला मिळवून देणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपाच्या शहराध्यक्षपदाची धुरा आता आमदार महेश लांडगे यांच्याकडे आली आहे. शितल शिंदे आणि अभिषेक बारणे यांच्या नावावर एकमत न झाल्यास अध्यक्षपदी ते स्वत:च्या समर्थकाची वर्णी लावून घेऊ शकतात. संतोष लोंढे, भीमाबाई फुगे, सुवर्णा बुर्डे यांच्या पैकी एक नाव ऐंनवेळी पुढे करत महेश लांडगे आपले ‘डावपेच’ टाकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेले स्थायीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार हे आज अर्ज दाखल झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.