पिंपरी : चाकण परिसरात 20 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ड्रग्ज विषय गाजत असतानाच पिंपरी (Pimpri) चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण परिसरातून २० कोटी रूपयांचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई आमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि.७) दुपारी केली असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चेतन फक्कड दंडवते (२८, रा. मलठण-आंबेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (२५, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (२५, रा. पाचर्णे मळा, ता.शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (४४, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (३१, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांनी बुधवारी (दि. ७) चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सेल पिंपळगाव येथे येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख श्रीराम पोळ यांना माहिती मिळाली. मिळालेली माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून २० कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला.

तसेच गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची कार रोख २३ हजार १०० असा एकूण २० कोटी पाच लाख २३ हजार १०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. हि कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक निरीक्षक महाले, सहाय्यक फौजदार शाकिर जिनेडी आणि त्यांच्या पथकाने केली आहे.