पिंपरी गुन्हे शाखेची कारवाई : पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने एकाला अटक करुन एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहेत. मोनु रसिले वर्मा (19, रा. म्हाळसाकांत चौक, निगडी. मूळ रा. साकीपुर, दत्तनगर, ता. तरफगंज, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे व फारुक मुल्ला यांना माहिती मिळाली की, एक तरुण आंबी चौकामध्ये शिवमल्हार हॉटेलसमोर पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी मोनु रिक्षातून आंबी चौकात आला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी मोनु याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. हे पिस्तुल त्याने विक्रीसाठी आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी 51 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करून त्याच्यावर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, फारुक मुल्ला, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, गोपाळ ब्रम्हांदे, सुखदेव गावंडे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांनी केली आहे.