रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करणाऱ्या 4 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रावण टोळी प्रमुखाच्या भावाचा खून करुन फरार झालेल्या चारही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. आशिष विशाल जगताप (23), विकास गोरख तांदळे (21), प्रसाद अशोक आल्हाट (25), सागर रमेश धनवटे (18, सर्व रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (वय 26, रा. जाधव वस्ती, रावेत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र दत्तात्रय जाधव (55, रा. रावेत जाधवनगर) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या आणि त्याचे मित्र आकुर्डी पोस्ट ऑफिससमोर असलेल्या एका गॅरेजजवळ दारू पीत बसला होता. दारू पिताना मित्रांमध्ये वाद झाला. त्यातूनच सोन्याच्या मित्रांनी सोन्याच्या डोक्यात गॅरेजमधील साहित्याने डोक्यात मारले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सोन्या रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तिथेच सोडून त्याचे आरोपी मित्र पसार झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा तपासणीपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. देहूरोड पोलिसांनी आरोपींना किवळे येथून अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.