पिंपरी : तोतया डॉक्टराने केलेली हॉस्पिटलमध्ये चक्क 1 वर्ष ‘नोकरी’; BAMS झाल्याचे भासवून हॉस्पिटलची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तो एक वर्ष एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता. वैद्यकीय कन्सलटंट म्हणून नोकरी मिळविण्यासाठी त्याने एका जनरल इन्शुरंन्स कंपनीत अर्ज केला. त्यामुळे तब्बल एक वर्ष हॉस्पिटलमध्ये नोकरी करणार्‍या तोतयाचे बिंग फुटले. पिंपरी पोलिसांनी त्याला बेड्या घातल्या आहेत. अक्षय केशव नेहरकर (रा. ऑनिक्स हॉस्पिटल, बिजलीनगर, चिंचवड, मुळ रा. पिसेगाव, पो. ताबंवा, ता. केज़ जि. बीड) असे या तोतया डॉक्टरचे नाव आहे.

याप्रकरणी विशाल भास्कर काटकर (वय ४९, रा. काटकर हाऊस, वरळी, कोळीवाडा) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी ते २५ मे २०२१ दरम्यान घडला आहे. आयसीआयसीआय लोबांर्ड जनरल इन्शुरंन्स कंपनीने वैद्यकीय कन्सलटंट म्हणून पद भरण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार अक्षय नेहरकर याने आपला रिझुम ईमेलद्वारे पाठविला. त्यात त्याने बी. ए. एम. एस. तसेच एम. डी. अ‍ॅपियर अशी पदवी टाकली.

सीटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओ. एन. पी. लिला हॉस्पिटल, ऑनिक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. त्याचा हा रिझुम पाहून कंपनीने त्याला मुलाखतीला पिंपरीतील मोरवाडी येथील कार्यालयात बोलावले. त्यात त्याने आपण डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदीयक रिसर्च सेंटर, पिंपरी चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगून पदवीचा रजिस्टर क्रमांक सांगितला. परंतु त्याला पदवीचे प्रमाणपत्र मागितले असताना त्याने ते दिले नाही. तसेच बिजलीनगर येथील ऑनिक्स हॉस्पिटलमध्ये एक वर्ष नोकरी केली असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अक्षय नेहरकर याला अटक केली आहे.