पिंपरी : सराईत चोरट्यांकडून सात लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दोन सराईत चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी सांगवी पोलिसांनी केली आहे. महेश तुकाराम माने ( 21, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. पाटसांगवी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), गणेश हनुमंत मोटे ( 20, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सुरु केलेल्या आरोपी दत्तक योजनेअंतर्गत सांगवी पोलीस गुन्हेगारांची तपासणी करीत होते. त्यावेळी दोन संशयित गुन्हेगार संशयितरित्या गायब झाल्याचे सांगवी पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दोन संशयित आरोपींची माहिती काढली. यामध्ये पोलीस शिपाई अरुण नरळे यांना माहिती मिळाली की, एक संशयित आरोपी महेश माने पिंपळे निलख विशालनगर येथील चौथे लॉन्स जवळ येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून सांगवी पोलिसांनी महेश याला एका मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने त्याचा साथीदार गणेश मोटे याच्यासोबत मिळून हिंजवडी परिसरातून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. गणेश मोटे याला ताब्यात घेऊन दोघांकडे कसून चौकशी केली असता सांगवी, चिंचवड, चिखली, वाकड परिसरात चोरी आणि भोसरी व हिंजवडी परिसरात वाहनचोरी केल्याचे सांगितले.

दोघांकडून 15 तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे सांगवी, चिंचवड, वाकड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन, चिखली, भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

Visit : Policenama.com