पिंपरी : साडेसात लाखांची रोकड चोरणारे दोघे 2 तासात गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पेट्रोल पंपावरील खिडकीचे गज कापून साडेसात लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांना भोसरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक करून चोरलेली रोकड हस्तगत केली.
नारायण अप्पा पवार (26) आणि रमेश प्रभू पवार (22, दोघेही रा. भारतमाता नगर, दिघी. मूळगाव पाटोदा, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील मुलाणी पेट्रोल पंपाच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. तेथील कपाटातील साडेसात लाख रुपयांची रोकड चोरून नेली. चोरट्यांनी सीसीटिव्ही फुटेजमध्ये कॅमेऱ्यावर चादर टाकून खबरदारी घेतली होती.

पेट्रोल पंपावर काम करणारा नारायण पवार यांच्या हालचाली पोलिसांना वेगळ्या वाटल्या. यामुळे पोलिसांनी त्याला खाक्‍या दाखविताच त्याने आपण आणि मावस भाऊ रमेश यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. भोसरी पोलिसांनी अवघ्या दोन तासात गुन्हा उघडकीस आणून साडेसात लाख रुपयांची रोकड चोरट्यांकडून हस्तगत केली आहे.

पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त स्मिता पाटील, सहायक आयुक्‍त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक निरीक्षक सिद्धेश्‍वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, समीर रासकर, सुमीत देवकर, संतोष महाडिक यांच्या पथकाने ही कामगिरी केली.