नाशिक जेलमधून फरार झालेल्या खुनातील आरोपीला 5 वर्षांनी अटक, पिंपरी गुन्हे शाखेची कारवाई

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणारा आरोपी पेरोल रजेवर सुटल्यानंतर फरार झाला होता. पोलीस त्याचा मागील पाच वर्षापासून शोध घेत होते. अखेर त्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने देहूरोड येथे सापळा रचून अटक केली.

ही कारवाई आज (शुक्रवार) करण्यात आहे. मल्हारी काशीनाथ जाधव (वय -58 रा. आयप्पा मंदिराजवळ, नढे नगर पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-5 चे पोलीस कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सावन राठोड आणि गणेश मालुसरे यांना एक खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देहूरोड येथे येणार असून तो नाशिक जेलमधून फरार झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देहूरोड येथे सापळा रचून अटक केली.

आरोपीकडे केलेल्या चौककशीमध्ये त्याच्यावर मुलूंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगत होता. 2015 मध्ये तो पेरोल रजेवर सुटला होता. पुन्हा कारागृहामध्ये न जाता तो फरार झाला होता. याबाबत त्याच्यावर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 राजाराम पाटील, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्रीधर जाधव, गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी सावन राठोड, गणेश मालुसरे, मयुर वाडकर, फारुख मुल्ला, संदिप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, दयानंद खेडकर, राजकुमार इधारे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रह्मांदे यांनी केली.