‘बाऊन्सर’ आणि ‘फायनान्स’ची वसुली करणाऱ्यांकडून ६ पिस्तूल; १५ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. दोघांकडून सहा पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एक कार शोरूममध्ये बाउन्सर आणि दुसरा परळी वैजनाथ येथे वसुलीचे काम करत होता; ही माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश मारुती साळी (26, रा. जुनी सांगवी), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गित्ते (30, रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत फिरत असताना पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना माहिती मिळाली की, काळेवाडी येथील लकी बेकरी समोर एक व्यक्ती संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे तसेच पिस्टल सारखे दिसणारे लायटर आढळून आले.

गणेश याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यामध्ये त्याने परळी येथील ग्यानोबा याच्याकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले. पोलिसांनी परळी येथे शोध घेऊन ग्यानोबा याला अटक केली. ग्यानोबा याच्यावर परळी शहर, परळी ग्रामीण, युसूफ वडगाव, रेणापूर लातूर, शिवाजीनगर पुणे, स्वारगेट पुणे आदी पोलीस ठाण्यात खून, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, वाहन चोरी असे 23 गुन्हे दाखल आहेत.

ग्यानोबा याने कालू सिंग जसवंत सिंग (रा. सिंघाणा, ता. मनावर, जि. धार, मध्यप्रदेश) याच्याकडून पाच पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसे व एक गावठी कट्टा विकत घेतल्याचे सांगितले. त्यातील दोन पिस्टल आणि दोन काडतुसे गणेश याला विकल्या आणि अन्य पिस्टल आणि काडतुसे विक्रीसाठी लपवून ठेवल्याचेही आरोपीने पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी एक लाख ६४ हजार रुपयांचे सहा पिस्टल आणि १५ जिवंत काडतुसे व पिस्टल सारखे दिसणारे लायटर जप्त केले.

गणेश हा वाकड येथील एका कार शोरूममध्ये बाउन्सरचे काम करत होता. तर आरोपी ग्यानोबा हा परळी वैजनाथ येथील एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत होता. शस्त्र पुरवणारा कालू हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, संजय गवारे, नारायण जाधव, प्रवीण दळे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, गौस नदाफ, तुषार शेटे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, तुषार काळे, सुरेश जायभाये, गोविंद चव्हाण, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.