पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेकडून 7 पिस्टलसह तिघांना अटक !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदा गावठी बनावटीचे पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून 7 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे असा एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर देहूरोड आणि तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने रावेर येथील एका हॉटेल बाहेर केलेल्या कारवाईत मनोज विष्णू जगताप (वय-20 रा. काळेपडळ रोड, हडपसर, मुळ रा. कोपरगाव जि. अहमदनगर) आणि जॉन काशीनो परेरा (वय-31 रा. अहमदनगर) यांना अटक केली. या दोघांकडून तीन गावठी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी मनोज जगातप याने घरामध्ये आणखी तीन देशी बनावटीचे पिस्टल आणि मॅगझीन लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी मनोज आणि जॉन यांच्याकडून 6 देशी बनावटीचे पिस्टल आणि 3 जिवंत कडतुसे असा एकूण 3 लाख 4 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत दिपक लिंबाजी सरोदे (वय-31 रा. वैदवाडी, हडपसर) याला अटक करून 1 देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमाटणे फाटा येथे करण्यात आली असून आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 राजाराम पाटील, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, दयानंद खेडकर, फारुख मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इधारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे व नागेश माळी यांच्या पथकाने केली.