Pimpri : ICICI चे एटीएम मशीन चोरणारे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चोरीच्या पिकअप टेम्पोचा वापर करुन थरमॅक्स चौकातून आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून 7 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (20, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर), शेऱ्या उर्फ श्रीकांत विनोद धोत्रे ( 23, रा. गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. एटीएम चोरीचा गुन्हा घडल्यानंतर विशेष तपास पथक आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार पोलिसांनी वाहन, वाहन मालक, चोरीचा मार्ग असा विस्तृत तपास सुरु केला. दरम्यान, 8 जून रोजी होळकरवाडी, औताडेफाटा येथून एक पिकअप चोरीला गेली असून त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याच पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम मशीन चोरण्यात आले होते.

पिकअपच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता पिकअप मालकाने त्यांचे पिकअप वडकी फाटा, सासवड रोड येथे मिळून आल्याचे सांगितले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून तपासाची चक्रे फिरवली. सुमारे 90 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढला.

हडपसर येथील महात्मा फुले नगर भागात सापळा लावून पोलिसांनी आरोपी अजयसिंग, शेऱ्या आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेतले. त्या तिघांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
आरोपींनी एटीएम चोरी करण्यासाठी होळकरवाडी येथून एक महिंद्रा पिकअप चोरी केले. चोरी केलेला पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम चोरून नेले. चोरलेले एटीएम मांजरी भागात मुळामुठा नदीकिनारी नेऊन हँडग्रँडर (कटर), हातोडी व छन्नीने तोडले.

त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून घेतली. त्यानंतर एटीएम नदीमध्ये उतरून पद्धतशीरपणे मध्यभागी फेकून दिले. चोरून आणलेले पिकअप वडकीफाटा, सासवडरोड येथे रस्त्याच्या बाजूला सोडून दिले. पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये महिंद्रा पिकअप तीन लाख रुपये, एटीएम मशीन साडेतीन लाख रुपये, रोख रक्कम 1 लाख 40 हजार रुपये, एटीएम ओढण्यासाठी वापरलेला लोखंडी वायर रोप, इलेक्ट्रीक केबल तसेच एटीएम कापण्यासाठी वापरलेले हँडग्रँडर 18 हजार रुपये, लोखंडी खंजीर एक हजार रुपये, हिरो होन्डा पॅशन मोटार सायकल 40 हजार रुपये आदींचा समावेश आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी रविंद्र गावंडे, प्रमोद लांडे, सोमनाथ बो-हाडे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सचिन उगले, नितीन खेसे, प्रविण पाटील, विशाल भोईर, किशोर परदेशी, सचिन मोरे, विजय मोरे, गणेश सावंत, मारूती जायभाये, प्रमोद हिरळकार, आनंद बनसोडे, प्रमोद गर्जे, अजंनराव सोडगिर यांच्या पथकाने केली आहे.