चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरारी झालेल्या आरोपीस अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर लोखंडी पट्टीने वार करुन फरार असलेल्या आरोपीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली.

करीम शाह अहमद शेख (64) असे अटक केलेल्याचे नाव आहे. रविवार दिनांक 5 जुलै 2020 रोजी सकाळी पत्नी हबीदा शेख (45, देहूरोड) हिच्यावर लोखंडी पट्टीने वार करून खून केला आहे. रविवार पासून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 5 चे अधिकारी व कर्मचारी हे आरोपीच्या शोधात होते आरोपीचे मुळगाव श्रीरामपूर येथील असल्याने त्या ठिकाणी व पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यात आला .

खुनातील आरोपी पुणे नगर रोडवरील रांजणगाव परिसरात पिवळ्या रंगाच्या प्लेजर गाडी वरून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना मिळाली. , पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र पत्नीच्या वागण्यात बदल झाला नाही, याचा राग आल्याने तिच्यावर रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास लोखंडी पट्टीने वार केले आणि तेथून पळून गेल्याचे आरोपीने कबूल केले . तसेच आरोपीने स्वतःही आत्महत्या करणार असल्याबाबत चिट्टी लिहून ठेवली होती. आत्महत्या करण्यासाठी पिवळ्या रंगाची रस्सी विकत घेतली होती. रस्सी व चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ही कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे , पोलीस शिपाई धनंजय भोसले , गाडेकर ,ठाकरे, बनसोडे, खेडकर, ईघारे , माने, फारूक मुल्ला , बहिरट , गुट्टे , पो हवा जाधव , किरनाळे यांचे पथकाने केली. तसेच भोसले यांचे सहकारी मनोज कदम यांनी पोलिसांना चांगली मदत केली.