गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो १७५ ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली . ही कारवाई निगडी, पेरूची बाग येथे करण्यात आली.

भीमराव दगडू धांडे (५७, रा . ओटास्कीम , निगडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , निगडी परिसरात पेरूची बाग येथे राजहंस बिल्डिंग क्रमांक १४ च्या समोर रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

पोलिसांनी परिसरात सापळा रचून भीमराव याला ताब्यात घेतले . त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो १५७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला . गांजासह ९९० रुपये असा एकूण २९हजार ९१५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करत त्याला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.