पिंपरी : दोघांकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पिंपरी आणि चिंचवड मधून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून यामध्ये दोन तरुणांना अटक केली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस शिपाई अजित अण्णा सानप यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश नामदेव पालवे (29, रा. रिहे मोरेवाडी, ता. मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएसबी चौक ते चिंचवड स्टेशन रोडवर फिनोलेक्स कंपनीच्या कंपाउंडजवळ मोहननगर येथे सापळा रचून मंगेश पालवे याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 50 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला.

चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दोनचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव कापसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल अशोक भेगडे (30, रा. घोटवडे, ता. मुळशी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला हॉस्पिटल कडून वाल्हेकरवाडीकडे जाणा-या रोडवर वाल्हेकरवाडी कॉर्नर येथे पोलिसांनी अमोल भेगडे याला अटक केली. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

हि कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.