न्यायालयाजवळ गोळीबार प्रकरण : रावण गॅंगचे दोघे गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड मधील रावण साम्राज्य आणि महाकाली या टोळ्यांतील टोळी युद्धातून आठवड्यापुर्वी महाकाली टोळीच्या सदस्यांवर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार करून पसार झालेल्या तिघांपैकी दोघांना पकडण्यात पिपंरी-चिंचवड गुन्हे शाखेला यश आले आहे.

रोहन चंदेलीया (२०, रावेत) आणि अशोक उत्तरेश्वर कसबे (२४, वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर अक्षय साबळे हा अद्याप फरार आहे. रोहन चंदेलीया हा रावण साम्राज्या टोळीतील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिंचवड, निगडी, देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अशोक कसबे याच्यावर देहूरोड, चिखली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) याने फिर्याद दिली आहे.

महाकाली टोळीचा म्होरक्या राकेश उर्फ महाकाली ढकोलिया याच्या एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या टोळीत फुट पडून रावण साम्राज्य आणि एस. के. ग्रुप अशा दोन टोळ्या सक्रीय झाल्या. या टोळ्यांमध्ये सतत वर्चस्व वादातून खूनांचे सत्र सुरु झाले होते. त्यानंतर रावण साम्राज्य व महाकाली टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानतंर रावण साम्राज्य टोळीतील विनोद गायकवाड याच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल आहे. त्यात विरुद्ध टोळीचा सदस्य सुरज वाघमारे हा साक्षीदार होता. तो ७ मार्च रोजी साक्ष देण्यासाठी न्यायालयात आला होता. त्याचवेळी मोक्कातील फरार आरोपी अक्षय साबळे हा ट्रीपलसीट न्यायालयाजवळ आला होता. त्यावेळी एकमेकांकडे बघण्यावरून कुणीतरी साबळे याच्या गाडीवर दगड मारला. त्यावेळी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्र. ३ जवळील कामगार पुतळ्याजवळ रेल्वे लाईनच्या सुरक्षा भिंतीजवळ झाडाखाली उभ्या शर्मा याला शिवीगाळ केली. त्यानंतर शर्मा व त्याचे साथीदार रेल्वे लाईनच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागले. त्याचवेळी अक्षय साबळे याने रिव्हॉल्वर रोखून सिद्धेश्वर याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर परिसरात एकच धांदल उडाली होती. पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानतंर पिपंरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनीट कडून दरोड्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु होता. त्यावेळी पथकातील सचिन मोरे व सावन राठोड यांना माहिती मिळाली की, शिवाजीनगर न्यायालयाजवळ फायरिंग करणाऱ्यांपैकी दोघे रावेत स्मशानभूमीजवळ येणार आहेत. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्यांना तेथून अटक केली. तर त्यांचा साथीदार अक्षय साबळे हा फरार आहे.

ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तय आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट १ चे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, कर्मचारी प्रमोद वेताळ, सावन राठोड, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.