जर्मनबेस कंपनीच्या व्यवस्थापनास ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या कामगार संघटनेच्या सरचिटणीसासह 9 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जर्मन बेस कंपनीच्या व्यवस्थापनस ‘ब्लॅकमेल’ करीत दगडफेक करणाऱ्या शिवक्रांती संघटनेचा सरचिटणीसासह नऊ जणांना म्हाळुंगे पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सरचिटणीस विजय पांडुरंग पाळेकर (51, रा. लोणावळा) याच्यासह संदीप नानासाहेब बोराडे (32, रा. रुपीनगर, हवेली), गजेंद्र ज्योतिबा पोरटे (38, रा. किवळे, मावळ), शरद महादेव खरात (33, रा. तळवडे), सुधीर मधुकर जगताप (28, विठ्ठलवाडी, देहूगाव), पी. बाळकृष्ण (52, रा. खराबवाडी, चाकण), अविनाश ध्रुव यादव (29, रा. खराबवाडी, चाकण), अण्णासाहेब बोराडे (22, रा. निघोजे), योगेश मदन पवार (29, रा. चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सागर अरविंद शौचे (34, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, निघीजे येथे ‘केल्विन इंडिया’ ही जर्मनबेस कंपनी आहे. या कंपनीतील शिवक्रांती या संघटनेचे कामगार वारंवार कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून निघून जात होते. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना जाब विचारण्यात आला. त्यामुळे कंपनी आणि कामगार यांच्यात तणाव निर्माण झाला. या संधीचा फायदा घेत शिवक्रांती संघटनेचा सरचिटणीस पाळेकर याने कामगारांना फूस लावली. तसेच, अन्य कामगारांवर जबरदस्ती करीत काम बंद करण्यास भाग पाडले.

पाळेकर याने कामगारांना भडकावून देत कंपनीवर दगडफेकही केली. यावेळी कामगारांना शांत करण्यासाठी बाहेर आलेल्या अधिकाऱ्यांना देखील त्याने शिवीगाळ केली.
घटनेची माहिती मिळताच उपायुक्त स्मिता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले. त्यांनी अधिक चौकशी केली असता पाळेकर याने कंपनीकडे ‘कामगारांना परमनंट करा, नाहीतर मला एक लाख रुपयांचा हप्ता द्या, अशी मागणी केल्याचे समोर आले. कंपनीने हप्ता देण्यास नकार दिल्यानंतर पाळेकर याने कंपनी चालू न देण्याची धमकी देखील दिल्याचे व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी खंडणी, दहशत पसरवणे, तोडफोडीचा गुन्हा दाखल करीत पाळेकरसह नऊ जणांना अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.