अनेक गुन्हयात वॉन्टेड असलेल्या सराईताकडून 4 पिस्तुलं, 4 काडतुसं हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या महाकाली टोळीतील सराईत गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

सागर कुमार इंद्रा (27, रा. देहूगाव) असे या सराइत गुन्हेगाराचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सागर हा घोटावडे गावाकडून बापूजी बुवा चौकातून हिंजवडीकडे येणार आहे अशी माहिती पोलीस नाईक आतिक शेख यांना मिळाली.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, पोलीस कर्मचारी महेश वायबसे, किरण पवार, नितीन पराळे, हनुमंत कुंभार, आतिक शेख, विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, चंद्रकांत गडदे, अमर राणे, झनक गुमलाडू, विकी कदम, अली शेख, आकाश पांढरे, रितेश कोळी यांच्या पथकाने दोन टीम तयार केल्या. एक टीम बापूजी बुवा चौकात तर दुसरी टीम गवारवाडी चौकात तैनात करण्यात आली. घोटावडेकडून येणा-या वाहनांची कसून टेहाळणी पोलिसांनी सुरु केली.

सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास एक दुचाकीस्वार संशयितरित्या आला. पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरु केला. संशयित आरोपी मेगापोलीस चौकाजवळ एका पानटपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला. त्यावेळी पोलिसांनी पानटपरीला वेढा देत सागर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या घरात आणखी दोन पिस्टल आणि दोन काडतुसे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून एकूण चार पिस्टल, चार जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल, बॅग असा एकूण 1 लाख 50 हजार 850 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.