चिंचवडच्या ‘त्या’ मटका अड्ड्यावर कारवाई, मटका ‘किंग’ मात्र ‘फरार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील सर्वात मोठा असणाऱ्या आणि मटका किंग म्हणून ओळख असणाऱ्या ‘पप्पू’च्या मटका अड्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावरून पोलिसांनी सहा हजार २० रुपये जप्त केले असून पाच जणांवर कारवाई केली आहे.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरूद्वारा रोडवरील झोपडपट्टीपाठीमागे पत्रा शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार, मटका अड्डा सुरु असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या गेल्या आहेत. मात्र या ठिकाणावर कारवाई होत नव्हती. या ठिकाणी मटका सुरु असल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली. त्यानंतर या अड्डयावर स्थानिक पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी तेथून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

या ठिकाणी सुरू असलेला अड्डा हा मटका किंग ‘पप्पू’ याचा आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ठिकाणी कारवाई केल्यानंतर हा मटका किंग फरार आहे. याच परिसरात आणखी एक अड्डा सुरु आहे. तसेच चिंचवडच्या हद्दीत आणखी मटका अड्डे सुरु असून त्यावरही कारवाई केली जात नाही.

ही करावाई पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव शिंगाडे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, रोहिणी शेवाळे आणि त्यांचे पथक यांनी केली.