चोरीच्या पाच दुचाकी आणि 12 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चिखली पोलिसांनी तिघांना अटक केलेल्या तिघांकडून आणि एका अल्पवयीन मुलाकडून पाच मोटारसायकल, 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

संदेश प्रभाकर पाटोळे (25), रुपेश जनार्धन सावदेकर (19), तेजस राजेश वानखेडे (18, तिघे रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक विपुल होले आणि पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना माहिती मिळाली की, तळवडे रोड चिखली येथील मंगलमूर्ती हॉटेलसमोर काहीजण थांबले आहेत. त्यांच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश जवादवाड, उपनिरीक्षक देशमुख, पोलीस कर्मचारी मंगेश गायकवाड, बाबासाहेब गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विपुल होले, नरहरी नाणेकर, कबीर पिंजारी, संतोष सपकाळ, अस्वले यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली. चौघांकडून पाच मोटारसायकल आणि 12 मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com